आरोग्यदायी चंदन

    Date : 05-Oct-2020
|


चंदन_1  H x W:  
 
चंदन

वैद्य विजय कुलकर्णी नाशिक

मो.९८२२०७५०२१

एखादी व्यक्ती चंदनासारखी झिजली असे काहींच्या बाबतीत म्हंटले जाते. खरोखर चंदन या झाडामध्ये आणि विशेषकरून त्याच्या खोडामध्ये स्वतः झिजून दुसर्याला सुगंध देऊन प्रसन्न करण्याचा गुण असतो. गुणाने अत्यंत शीतल आणि सुगंधी असणार्या चंदनाचा उपयोग आयुर्वेद शास्त्राने मानव जातीच्या आरोग्यासाठी करून घेतला आहे. चंदन हे पांढरे आणि काहीसे पिवळसर असे दिसते. याची झाडे कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्याचे खोड औषधी गुणाचे असते. याला श्वेतचंदन असेही म्हणतात. चंदनाचे खोड पाण्यात उगाळले तर अत्यंत मनमोहक असा सुगंध येतो. याने मनाचे आरोग्य उत्तम राखले जाते.

चंदन हे गुणाने रुक्ष आणि पचायला हलके असते. त्यामध्ये असलेल्या तेलामुळे त्याला सुगंध असतो. चंदनाला गांधराज असेही म्हणतात.उन्हाळ्यात याचे गंध कपाळाला तसेच पोटावर नाभीभोवती लावल्यास दाह कमी होतो. चंदन आणि वाळा यांचे पाणी पोटातून घेतल्यास लघवीचा दाह कमी होतो. उन्हामुळे किंवा शरीरातील पित्तामुळे लघवीला जळजळ होते, काही वेळा लाघवी साफ होत नाही अशावेळी चंदनाचे पाणी योग्यसल्ल्याने योग्य प्रमाणात घेता येते.उन्हामुळे त्वचेचा होणारा दाह देखील याच्या लेपाने कमी होतो. व्यवहारात ज्याला नागीण म्हणतात अशा विकारात त्वचेची खूप आग होते.आणि वेदनाही होतात. अशावेळी वैद्यकीय सल्ल्यानुसार चंदन आणि जेष्ठमध यांचा लेप केल्यास फायदा होतो. चंदन सुगंधी असल्याने घामाला येणारी दुर्गंधी याच्या वापराणे कमी होते. त्यासाठी स्नानाचे वेळी चंदनाचे उटणे करून वापरावे. अतिशय ताप आल्यास कपाळावर तळहात आणि नाभी येथे चंदनाचा लेप लावतात. यानेही ताप कमी होतो. स्त्रियांमधील मासिक पाळीच्या वेळी अधिक अंगावर जात असल्यास चंदनाचा उपयोग पोटातून करावा. त्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा.नाकातून रक्त येणे , मुळव्याधीतून रक्त पडणे यातही चंदनाचा चांगला उपयोग होतो. चंदनाचे सुगंधी अत्तर तयार करून ते वापरतात. त्याने मन अत्यंत प्रसन्न होते. हृदयासाठी देखील चंदन अतिशय उपयुक्त आहे. अम्लपित्तात तसेच आतड्याच्या विकारात दाह होत असल्यास चंदनाचा खूप चांगला उपयोग होतो. अशा प्रकारे स्वतः झिजून दुसर्याला सुगंध आणि उत्तम आरोग्य देणारे औषधी चंदन आपल्या रोजच्या वापरात असावे. त्याने आपले आरोग्य चांगले राहते.