दुर्गा आरोग्यदायिनी भाग :१

|

                         दुर्गा आरोग्यदायिनी भाग :१

                                                                                                                               वैद्य विजय कुलकर्णी
                                                                                                             संपादक आरोग्य चिंतन 
                                                                                                                     ९८२२०७५०२१ 

      आपल्या भारतीय कालमानानुसार पितृ-पंधरवडा संपल्यावर अत्यंत उत्साहात नवरात्र उत्सावला प्रारंभ होतो. घटस्थापनेने याची सुरुवात होऊन पुढील नऊ दिवस श्री दुर्गा देवीची उपासना केली जाते. यादरम्यान विशेषतः महिला वर्गाकडून दुर्गा देवीची आराधना तसेच उपास-तपास केले जातात. खरेतर दुर्गा देवीची पुजा करणे म्हणजे महिलांनी या निमित्ताने आपले सर्वाथाने सबलीकरण करणे होय याला महिलांचे आरोग्य देखील अपवाद नाही. नवरात्रात या दिवसात आपल्या आरोग्याशी संबंध असलेल्या अनेक गोष्टीचा समावेश असतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे श्री दुर्गा पूजेचा सदुपयोग आपण सर्वांनी त्यात हि विशेष महिलांनी आपल्या आरोग्य संवर्धनासाठी करून घ्याला हवा.

श्री दुर्गा देवी हि स्त्री शक्तीचे एक स्वरूप आहे या देवीची विविध प्रकारे उपासना करणे म्हणजे अशा या स्त्री शक्तीला आणखी बळ देण्याचा प्रयत्न करणे. स्त्रीचा सर्वांगीण विकास होणे हे यामध्ये अपेक्षित आहे. तो विकास साधण्यासाठी तिचे आरोग्य देखील उत्तम असणे आवश्यक असते. खरेतर एकूणच कुटुंबाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रथम त्या कुटुंबातील स्त्रीचे आरोग्य चांगले असायला हवे. नवरात्रातील विविध उपक्रम, कार्यक्रम यांची आपल्याकडे परंपरेने चालत असलेली एकूण योजना पाहिल्यास त्यातून आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी बऱ्याच गोष्टी उपयुक्त आहे असे दिसते. त्या गोष्टींचे प्रबोधन व्हावे या हेतूने या लेखनमालीकेचे सादरीकरण या ठिकाणी करण्यात येणार आहे.

घटस्थापनेला धान्य पेरून त्याचे पुढे नऊ दिवसात अंकुर फुटतात या नऊ दिवसात महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपवास करतात. विविध रंगाच्या वेशभूषा स्वतः परिधान करतात आणि देवीला हि नेसवतात. या उत्सवात विशेष गुजरात मध्ये दांडिया खेळ खेळला जातो. आता तर त्याची परंपरा अन्य राज्यातही सुरु झाली आहे. दुर्गा देवीला खीर, केशरी भात यांचा नैवेद्य दाखवला जातो विविध फुलांच्या माला, गजरे तयार केले जातात. नवचंडी यज्ञ केला जातो\. या सर्वांचा परिणाम आपल्या मनाचा उत्साह वाढवण्यासाठी, ते प्रसन्न करण्यासाठी आणि शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी कसा होतो हे आपण यापुढे क्रमाने बघणार आहोत.