हिवाळ्यात वाढणारे शीतपित्त

|

                       हिवाळ्यात वाढणारे शीतपित्त

 

                                                              वैद्य विजय कुलकर्ण, नाशिक

                                                                    मो.९८२२०७५०२१

            डॉक्टर,माझ्या अंगावर नेहमी पित्त येते चक्रंदळे उठतात आणि सर्व अंगाला खूप खाज सुटते.अंग लाल होऊन जाते ,अशा प्रकार ची तक्रार घेऊन अनेकजन आपल्या वैद्यकीय सल्लागाराकडे जातात.मला कसली तरी एलर्जी असावी हे मत देखील ते आपल्या डॉक्टरांना याबाबतीत सांगून टाकतात.वर्षानुवर्षे हि तक्रार आपल्या शरीरात बाळगून ठेवणारे अनेक जन पहावयास मिळतात.आयुर्वेदीय चिकित्सकाकडे येणारा हा रुग्ण इतरही अनेक शारीरिक तक्रारी घेऊन येतो.

आयुर्वेदाने या तक्रारीचे वर्णन शीतपित्तअसे केलेले आहे. ‘पित्तया शरीरातील दोषाशी संबंधित अशी ही तक्रार आहे.

कारणे हे पित्तहोण्याCARIA ची अनेक कारणे आपल्या नकळत आपल्याकडून घडत असतात.त्या कारणांचा परामर्श येथे घेणे हे संयुक्तिक ठरेल.आपल्या आहार विहारातील अनियमितपणा हे या पित्त होण्याचे एक प्रमुख कारण होय. केव्हातरी जेवायचे,काहीही खायचे, कुठेही खायचे,स्वच्छ,अस्वच्छ चांगले वाइट हे काही न बघता खायचे,केव्हाही झोपायचे,जागरण अतिप्रमाणात करायचे,अधिक तिखठ,मसालेदार आंबट असे पदार्थ नेहमी खाण्यात ठेवायचे अशा प्रकारची कारणे अनेकदा आपल्याकडून घडली की पित्ताचा असा त्रास होण्याची शक्यता बळावते.

सतत गार हवेचा संपर्क हे देखील या शीतपित्ताचे कारण असू शकते.काही विशिष्ट औषधी द्रवे पोटात गेल्यानेही काहींना असा त्रास होतो. तर काहींना साधी तुरीची डाळ,वांगे यापैकी काही खाल्ले तरी पटकन त्रास होतो.

सध्याच्या काळात मांसाहाराचे प्रमाण फार वाढत चालले आहे.अयोग्य पद्धतीने केलेला मांसाहार देखील या पित्तास कारणीभूत ठरू शकतो. ‘पोट साफ नसणे’ (मलावरोध) हे देखील या पित्ताचे एक मुख्य कारण होय.

या कारणांमुळे निर्माण झालेले पित्त शरीराच्या बऱ्याचशा भागांवर पसरते.विशेषतः पाठ,पोट याठिकाणी त्याची तीव्रता अधिक जाणवते.मोठ्या प्रमाणावर सुटणारी खाज आणि त्यामुळे येणारी अस्वस्थता हि दोन प्रमुख लक्षणे या व्याधीमध्ये दिसतात.

अंगावर छोटी - मोठी लालसर चक्रंदळे येतात. बऱ्याचदा हिवाळ्यातील थंडीमुळे हा त्रास अधिक होतो.काही वेळा हा त्रास तात्कालिक स्वरूपाचा असू शकतो तर काही वेळा अनेक दिवस टिकणाराही असू शकतो.

उपचार स्वतःचे स्वतः नकोत या पित्तावर अनेक लोक स्वतःचे स्वतःच उपचार करण्याचा प्रयत्न करताना आढळतात.कोणीतरी सांगितले म्हणून आमसुलाचे सार लाव ,मिरे आणि तूप एकत्र कालवून लाव,असे उद्योग करीत बसतात.काही वेळा त्याने लाभही होतो,पण प्रत्तेक वेळेस तो होईलच असे सांगता येत नाही आणि स्वतःच उपचार करण्याची प्रवृत्तीच चांगली नाही.ती धोकादायक आहे हे यानिमित्ताने लक्षात ठेवले पाहिजे.

आयुर्वेदीय उपचार यामध्ये सर्वप्रथम हि तक्रार घेऊन येणार्यांमध्ये जर मलावरोध असला तर त्रिफळा चुर्नासारखे सौम्य विरेचक देऊन कोठा साफ करावा लागतो. ‘विरेचनहि पित्तदोशामुळे होणाऱ्या अनेकविध विकारांवरील एक प्रमुख चिकित्सा आहे असे आयुर्वेदाशास्त्र सांगते.याबरोबरच काही पित्तशामक औषधेही जोडीला द्यावी लागतात.गुलकंदासारखे श्रेष्ठ औषध यामध्ये लागू पडते.यावरचे आणखी एक घरगुती औषध म्हणजे हळदहोय.या हळदीपासून बनवलेले हरिद्रा खंड नावाचे औषध यात अतिशय लागू पडते.त्याचप्रमाणे रक्त शुद्ध करणारी काही औषधेही यामध्ये उपयोगी पडतात.

त्वचेला बाहेरून लावण्यासाठी मरीच्यादी तेल ,चंदनबला लाक्षाधी तेल अशा तेलांचा उपयोग यशस्वीपणे केला जातो.अर्थात हे सर्व उपचार येथे केवळ माहितीसाठी लिहिले आहेत. या सर्वांचा उपयोग नेहमीच वैद्यकीय मार्गदर्शनाखालीच करावा.या उपचारांबरोबरच वर वर्णन केलेली पित्त निर्माण करणारी कारणे दूर ठेवण्याचा प्रयत्न जरूर करावा. ज्यांना अशा पित्ताचा नेहमी त्रास होतो अशांनी ते मांसाहारी असल्यास पूर्ण शाकाहारी बनावे. दही ,वांगी इ.अन्नघटक जपून खावेत.

अशाप्रकारे या शितपीत्तासाठी योग्य दिशेने व योग्य पद्धतीने वैद्यकीय मार्गदर्शनाखाली उपचार करून घ्यावेत.