आरोग्यदायी नारळ
लेखक- वैद्य विजय कुलकर्णी
मो न.- ९९२२०७५०२१
श्रीफळ या पवित्र नावाने ओळखले जाणारे नारळ हे केवळ सामाजिक, सांस्कृतिक अशा समारंभामध्ये महत्त्वाचे स्थान टिकवून आहे असे नाही, तर वैद्यकीयदृष्ट्याही यामध्ये अनेक ओषधी गुणाचा समावेश आहे. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हितकारक आणि उपयुक्त असे हे श्रीफळ नित्य उपयोगाचे आहे. विविध समारंभामध्ये याचा प्रसाद म्हणून उपयोग केला जातो.गणेशोत्सवामध्ये याची खिरापत वाटली जाते. एखाद्याच्या सत्कार करताना त्याला श्रीफळ देऊन गौरविले जाते. कोणत्याही चांगल्या कार्याचा शुभारंभ करताना श्रीफळाचा प्रसाद वाटला जातो. अर्थातच, नारळाचा काही अंश आपल्या पोटात जावा, हाच खरा उद्देश या सगळ्यामागे असतो. नारळामध्ये असलेल्या अनेक ओषधी गुणांमुळेच त्याला एवढे महत्त्व आहे.
आयुर्वेदातील वर्णन:- आयुर्वेद हे आपल्या भारत देशाचे वैद्यक आहे. आजही त्याची उपयुक्तता आहे.
या वैद्याकानेही नारळामध्ये असलेल्या अनेक ओषधीगुणाचा उल्लेख केलेला आहे. आयुर्वेद संहितामध्ये याचा उल्लेख सापडतो.
वाग्भट या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये नारळ हे अत्यंत पौष्टिक असणारे फळ आहे असे वर्णन आहे. त्यामध्ये प्राधान्याने मधुर रस आढळतो. गुणाने थंड असलेले हे नारळ स्निग्ध आहे. शरीरातील रुक्षता (कोरडेपणा) दूर करण्यासाठी यामुळेच मदत होते. रक्तातील अशुद्धता दूर करण्याचे कार्यही नारळ करते. म्हणजेच रक्त शुद्धीकरण असा विशेष गुण त्याच्यामध्ये आहे.
नारळ हे शुक्रवर्धकाही आहे, असे आयुर्वेद सांगतो. नारळ हे पौष्टिक असल्याने हिवाळ्यामध्ये नारळाच्या वड्या करून खाण्याचा प्रघात आहे. ज्यांना आपले वजन वाढवायचे असेल अशांनी नारळाच्या वड्या जरूर खाव्यात,याने लाभ दिसतो. शुक्रवर्धक असल्याने शुक्रक्षय या तक्रारीवरहि नारळाचा उपयोग वैद्यकीय सल्ल्याने करावा. शरीरातील पित्त दोषाचे शमन नारळाच्या सेवनाने होते. कारण नारळ थंड आहे. नारिकेल असे संस्कृत नाव या फळाला आयुर्वेदाने दिलेले आहे.
अनेक तक्रारीवर नारळाचा उपयोग:- नारळामध्ये असलेलेल्या विविध ओषधी गुणांमुळे शरीराच्या अनेक वेगवेगळ्या तक्रारींवर त्याचा चांगला उपयोग होतो. वर सांगितल्याप्रमाणे शरीर सुदृढ करण्यासाठी याचा उपयोग होतो. अशक्तपणा, थकवा वाटत असल्यास नारळातील पाण्याचे सेवन केल्यास अप्रतिम लाभ होतो. तसेच नारळाच्या वड्यांना आयुर्वेदाने नारिकेल खंड असे म्हटले आहे. कोवळ्या नारळाला शहाळे म्हणतात. या शहाळ्याचे पाणीदेखील शरीराला खूप उपयुक्त ठरते. एखाद्याला आजारपणामुळे शरीरातील निर्माण झालेला थकवा कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे शरीराला येणारी मरगळ याच्या सेवनाने निश्चित कमी होते. सारखी तहान लागणे या तक्रारींवरहि या पाण्याचा चांगला उपयोग होतो. त्याचप्रमाणे उन्हामुळे आलेल्या जास्त घामामुळे निरुत्साह-थकवा शहाळ्याच्या पाण्याने कमी होतो.
उन्हाळ्यामध्ये किंवा एरव्हीदेखील शीतपेये किंवा अन्य पेयांच्या तुलनेत शहाळ्याचे पाणी खूपच आरोग्यदायी ठरते. शहाळयात असलेले ओले खोबरे (मलई) अत्यंत पुष्टीदायक असते. नारळाचे खोबरे आणि गुळ यांचे मिश्रणहि शरीरात बळ निर्माण करते. शरीरात झालेली जास्त उष्णता कमी करण्यासाठी नारळाचा चांगला उपयोग होतो. नारळाचे पाणी-नारळाचे खोबरे यांचा वापर यासाठी करता येतो. लघवीची जळजळ, हात-पायांची आग होते, अशा तक्रारींवर कोथींबीरचा रस आणि नारळाचे ओले खोबरे असे मिश्रण देतात.
एकदम अधिक जुलाब झाल्यास शरीरातील पाण्याचा अंश कमी होतो, अशा वेळेस नारळाचे पाणी खूप उपयोगी पडते. यामुळे कमी झालेला पाण्याचा अंश भरून निघण्यास मदत होते. नारळाचा उपयोग शरीराला आतून जसा होतो, तसा बह्ता हि त्याचा ओषधी उपयोग होतो. नारळाच्या तेलाचा उपयोग डोक्याच्या केसांची वाढ करण्यासाठी होतो व त्यामुळे केस काळेभोर राहतात. डोके शांत राहते. या तेलाचा मालीशसाठीही चागला उपयोग होतो. अशाप्रकारे नारळाचा शरीरासाठी चांगल्या पद्धतीने उपयोग आपण सर्वांनीच करून घ्यायला हवा.