चेहऱ्यावरील मुरूम पुटकुळ्या व आयुर्वेद

|

        चेहऱ्यावरील मुरूम पुटकुळ्या व आयुर्वेद

लेखक : वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक)

मो. ९८२२०७५०२१

     चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या येण्याची तक्रार विद्यार्थीदशेत अनेक जणांमध्ये पहावयास मिळते. हे असे का बरे होते? चेहरा विद्रूप करणाऱ्या या पुटकुळ्या उगाचच येतात का? त्याला काही कायमचे उत्तर आहे की नाही? अशा प्रकारचे एक ना अनेक प्रश्न या त्रासाला कंटाळलेले अनेकजण वारंवार विचारत असतात. आपला चेहरा हा आपल्या सौदर्यातील एक महत्वपूर्ण घटक असल्याने चेहऱ्याच्या अशा तक्रारीबद्दल विशेष जागरूकता आढळून येते.

आयुर्वेद शास्त्राने या तक्रारीचा सखोल विचार केलेला असून त्या तक्रारीच्या मूळ कारणांचाही विचार केलेला आहे आणि त्यावरील चीकीत्सेचेही वर्णन केलेले आहे.

सुश्रुत या आयुर्वेदीय विद्वानाने चेहरा दुषित करतात म्हणून मुखदुषिका असे सार्थ नाव त्यांना दिलेले आहे.

वात, पित्त, आणि कफ हे तीन दोष आपल्या शरीराचा कारभार चालवतात. रस, रक्त आदी सात धातू हे या शरीराचे धारण करतात. वरील तीन दोषांपैकी एखादा दोष प्रकुपित झाला की तो शरीरात सात धातुंपैकी कोणाला तरी दुषित करतो आणि आपल्या शरीरात व्याधींची निर्मिती होते.

चेहऱ्यावर निर्माण होणाऱ्या मुरूम पुटकुळ्या या कफ, वायू आणि रक्त या तीन घटकांमध्ये विकृती निर्माण झाल्याने होतात. रक्तदूष्टीमुळे हा प्रकार निर्माण होतो. आपल्या आहार विहारमध्ये आढळणारी अनेक कारणे यासाठी सहाय्यभूत ठरतात. त्या कारणांचा विचार येथे करणे आवश्यक आहे.

मुखदुषीका होण्याची कारणे:

सध्याच्या तथाकथित धावपळीच्या युगामध्ये आपल्या आहाराकडे कोणाचे लक्ष नाही. सतत तिखट, मसालेदार, आंबट, खारट असे पदार्थ खाणे, दह्याचा अतिप्रमाणात वापर, तंबाखू, धुम्रपान अशी व्यसने या गोष्टी चेहऱ्यावर या मुरूम पुटकुळ्या निर्माण करण्यास बऱ्याचदा कारणीभूत ठरतात. त्याचप्रमाणे सततचे जागरण, अतिचाहापन या दोन गोष्टीदेखील याला कारणीभूत ठरतात. पोट साफ नसणे हेदेखील या मुखदुषीकांचे महत्वाचे कारण असते.

वर सांगितलेली कारणे सतत बराच कालपर्यंत घडत राहिल्यास हमखास मुरूम पुटकुळ्याचा त्रास होतो. यामध्ये चेहऱ्यावर लहान मोठे फोड येतात. त्यांचा आकार कमी जास्त होतो. त्यामधून कधीकधी पिवळा, पांढरा असा पु सारखा पदार्थ येतो. अनेकदा हे फोड हाताने मधूनच फोडण्याची अनेकांना सवय असते. या सवयीमुळे त्या फोडाच्या ठिकाणी चेहऱ्यावर डाग राहतात आणि चेहरा अधिकच विद्रूप होतो. तरुण वर्ग आपल्या सौंदर्याच्या बाबतीत विशेष जागरूक असल्याने बर्याचदा बाजारामध्ये उपलब्ध असणारी अनेक निरनिराळी क्रीम्स औषधे स्वतःचे स्वतः वापरून बघण्याची त्या मंडळीना सवय असते. चेहऱ्यावरील मुरूम पुटकुळ्या हा विषय स्वतः निर्णय घेऊन सोडवण्याचा नसून योग्य वैद्यकीय सल्ल्याच्या आधारे सोडवण्याचा प्रश्न आहे.

आयुर्वेदीय उपचारांची दिशा :

रोगाच्या उपचारातील प्रमुख भाग म्हणजे त्या रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टीना दूर करणे. यावर उपचार करण्याआधी प्रत्येकाने आपल्या बाबतीत वर सांगितलेली कारणे घडत असल्यास ती टाळण्याचा प्रयत्न करावयास हवा.

असा त्रास होणाऱ्यांचे पोट साफ होत नसल्यास ती तक्रारही आयुर्वेदीय उपचारांनी दूर करत येते. यासाठी त्रिफळा चूर्ण योग्य मात्रेत वैद्यकीय सल्ल्याने रात्री झोपण्यापूर्वी घेणे हे फायद्याचे ठरते. कामदुधा, गुलकंद अशी काही औषधेही त्यावर चांगली उपयोगी पडतात. अर्थात त्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक ठरतो. त्रिफळाच्या काढ्याने चेहरा धुण्यानेही यामध्ये फायदा होतो. तसेच चंदन, वाळा इतर काही वनस्पतींपासून तयार केलेल्या लेपांचाही फायदा चेहऱ्यावरील या मुरूम पुटकुळ्यासाठी होतो. आयुर्वेदातील रक्तमोक्षण विरेचन अशा पंचकर्मांचाही उपयोग या त्रासाची तीव्रता अधिक असेल तेव्हा होतो. अर्थात ही पंचकर्मे वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच करावी लागतात. अशा प्रकारे हा सर्व विषय अतिशय सुज्ञ पद्धतीने समजून घ्यावा व योग्य दिशेने त्यावर उपाययोजना करून घ्यावी.