हृदयरोग्यांचा फिटनेस
लेखक वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक)
मो. ९८२२०७५०२१
भारतामध्ये मधुमेह आणि हृदयरोग यांचे प्रमाण फार गतीने वाढत आहे. यामुळे या रोगांच्या संधार्भात जागृती निर्माण होऊन त्यांपासून आपले संरक्षण करण्यासाठी प्रबोधनही व्हावे याकरिता जागतिक स्तरावर ‘मधुमेह दिन’ आणि ‘हृदयदिन’ पाळला जातो. हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीची संख्या मोठी असल्याने त्यांचासाठी तसेच हृदयरोग होऊ नये अशी सदिच्छा असणाऱ्यांसाठी हे हृदगत.
हृदयरोग्यांना सकाळी लवकर उठण्याची गरज आहे. सकाळचे रम्य वातावरण मनही प्रसन्न करते. मनाचा आणि हृदयाचा असलेला जवळचा संबध लक्षात घेता सकाळी हृदय्रोग्यानी लवकर (सूर्यदयापूर्वी) उठून प्रथम मलमुत्र विसर्जन करावे. मलावष्टभाची कोणत्याही स्वरुपाची तक्रार हृदय्रोग्यांनी फार काळ अंगावर काढू नये. योग्य तो वैद्यकीय सल्लाही यासाठी वेळोवेळी घ्यावा. सकाळी जेवढा वेळ सोसेल तेवढा वेळ अशा व्यक्तींनी मोकळ्या हवेत फिरायला जावे. मोकळ्या हवेतून मिळणारा प्राणवायू या व्यक्तीना ताजातवाना करतो. हे फिरणे अर्थातच आपल्या त्रासाला अनुसरून कमी अधिक असावे. किती फिरावे याला स्पष्ट नियम नाही. सोसवेल एवढे फिरावे. फिरण्याचा नावावर उगीचच परिश्रम करीत राहू नये. सकाळच्या पेयपानात ‘गायीचे दुध’ हे हृद्रोग्यांनीउत्तम. त्याने धातुपुष्टी होते. मांसपुष्टी होते. त्याचप्रमाणे पेयपानात ‘सुवर्ण सिद्धजल’ हे देखील उपयुक्त असते. यामध्ये सोन्याचे वळे अग्नीवर तापवून पाण्यात विजवावे. ते पाणी गाळून ठेऊन दिवसभर पिण्यासाठी वापरावे. याचप्रमाणे काहीवेळा सोन्याचे वळे पाण्यात टाकून उकळून घेण्याचीही प्रथा आहे, सकाळी उठल्या उठल्या (दात घासल्यावर) पाणी पिण्याची अनेकांना सवय असते. प्रत्येक हृद्रोग्यांनी (तसेच इतरांनाही) हि सवय सोसवेल, अशी नाही हे पक्के लक्षात ठेवावे.
रात्रीची झोप चांगली शांत होणे हे या मंडळीच्या बाबतीत अतिशय महत्वाचे. सतत विचार, चिंतन, चिंता करण्याची सवय असली तर झोप लागत नाही. झोपेची गोळी घ्यावी लागते. हि सवयही वाईटच. त्याऐवजी रात्री झोपताना डोक्याला तेल लावणे सकाळी स्नानाच्यावेळी नीट अभ्यंग करणे या उपायांची योजना उपयुक्त आणि सुरक्षित ठरते. योगासनांचा अवलंब हाही हृद्रोग्यांच्या दिनक्रमातला एक आवश्यक भाग होय. योगासनात प्राणायामाचा उपयोग फुफ्फुस-हृदय यांची शक्ती वाढवण्यासाठी होऊ शकतो. हृद्रोग्यांत आवश्यकता असलेली मानसिक शांतताही योगासनांमुळे चांगली लाभते.
हृद्रोग्यांचा आहार हा खुपच महत्त्वाचा भाग आहे. वनस्पती तुपाबरोबरच या मंडळीना साजूक तुपाचीही भीती वाटते. गाईचे साजूक तूप या मंडळीना योग्य प्रमाणात घेण्यास हरकत नाही. अर्थात हे प्रमाण प्रकृतीसापेक्ष ठरवावे लागते. इतर वनस्पती तुपाचा मात्र हृद्रोग्यांनी आहारात वापर करू नये.
पचायला जड असणारे पदार्थ टाळणे हेही यांना आवश्यक असते. अतिथंड पेये, अतिथंड पदार्थ, आईस्क्रीम, फ्रीजमधले पदार्थ, हवाबंद डब्यातले पदार्थ यांचा वापर हृद्रोग्यांनी शक्यतो टाळावा. दही हा पदार्थ अभिष्यंदी म्हणजे शरीरात चिकटपणा वाढवणारा, अवरोध करणारा असल्याने तो या मंडळींनी टाळलेला बरा. अतिस्निग्ध पदार्थाचे सेवन ‘हृद्रोग’ वाढवणारे ठरते. तीच गोष्ट अत्युष्ण पदार्थाचीही आहे चहा, कॉफी यांचे सेवन अर्थातच मर्यादित ठेवावे. तंबाखू, धुम्रपान, मद्यपान यापासून दूर राहणे आवश्यक आहे.
हल्ली बायपास सर्जरीचे प्रमाण वाढलेले आहे. याचे सगळे मूळ आपल्या जीवनशैलीत आहे. फास्ट फूडची दुनिया महागात पडू लागली आहे. ताणतणावहि धोकादायक ठरू लागले आहेत. टी.व्ही. समोर जेवण्याची सवय वाढते आहे. दोन खाण्यामधले अंतर कमी असले तर हृदयाला ते चांगले नाही.
हृदयाला हितकारक अशा पदार्थाचे सेवन हाहि हृद्रोग्यांच्या दिनक्रमातला आवश्यक भाग असावा. डाळिंब हे फळ तसेच काही आम्ल पदार्थ (दही सोडून) हृदयाला हिताचे आहेत. ‘सोने’ हेही निश्चितपणे हृद्य आहे म्हणजेच हृदयाला हितावह आहे . मन शांत-नियंत्रणात ठेवणे हेही हृदयाला हिताचे आहे. लोभ, ईर्ष्या, द्वेष, मत्सर यांना दूर ठेवणे हेही हृदयाला हिताचे. कोणावरही रागावणे चांगले नाही. हृदयाला हिताचेहि नाही. मधूमेहाचा त्रास हृद्रोग्यांना असल्यास तो आटोक्यात ठेवणे हे अत्यावश्यक ठरते. रक्तदाबाचीहि वाढण्याची प्रवृत्ती असली तर ती काबूत ठेवणे गरजेचे आहे. अति परिश्रम टाळणे केव्हाही हिताचे. हृदयगती स्थिर असणे हेही आवश्यक असते. त्यासाठी वायूचे नियंत्रण अधिक आवश्यक आहे.
दुपारची झोप शक्यतो टाळून योग्य तेवढी विश्रांती घेणे हृद्रोग्यांनी कराबे. आरामखुर्चीवर बसून (आडवे न झोपता) एखादी छोटी डूलकी आराम देऊ शकते. खूप मैदानी खेळ खेळणे हेही हृद्रोग्यांना तापदायक ठरू शकते. अशा सर्व दृष्टीनी हृद्रोग्यांनी स्वास्थ्य देणारी दिनचर्या ठरवावी व पाळावी.