खजूर:हिवाळ्यात उपयुक्त

|

             खजूर:हिवाळ्यात उपयुक्त

वैद्य. विजय कुलकर्णी

मो.नं. ९८२२०७५०२१

            हिवाळा हा आरोग्याच्या दृष्टीने बळ कमवण्याचा हंगाम मानला जातो.त्यामुळे पुष्टीदायक,सत्वयुक्त अशा गोष्टीचा समावेश या हंगामात आहारात असावा.खजूर हा अशा सत्वयुक्त गोष्टीपैकी एक आहे.

खजूर :- सहज उपलब्ध होऊ शकणारा एक पौष्ठिक पदार्थ.हिवाळ्यामध्ये तर याची उपयुक्तता अधिकच असते.चवीने मधुर,गुणधर्माने स्निध व पचावयास जड असे पदार्थ हिवाळ्यामध्ये आपले शरीर सहजरीत्या स्वीकारत असते.अश्या काळात वरील सर्व गुणांनी युक्त अशा खजूर आपल्या शरीराला निश्चितपणे पुष्टी व बळ देतो यात प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथकारांनी देखील खजुराचा उल्लेख केलेला आढळतो.तसेच त्यांच्या गुणधर्माबद्दलही त्यामध्ये सविस्तरपणे वर्णन आलेले आहे.

शरीरामधील पित्तदोषाच्या विकृतीमुळे होणाऱया लक्षणाच्या उपशम करण्यासाठी खजुराचा उपयोग होतो. आयुर्वेद शास्त्राने खजुराचे फळ हे हृदयाला अत्यंत हितकर असल्याचे सांगितले आहे. तसेच अत्यंत पौष्ठिक,शरीराचे तपर्ण करणारे असे त्याचे वर्णन आहे.अतिश्रमाने येणारा थकवा दूर करणारे हे फळ आहे.

खजूर+लोण्याचे तूप हा सहयोग उत्कृष्ट शक्तिवर्धक असा आहे. शरीराचे दौबॅल्य कमी करून स्थायुना बळ देण्याचे कार्य खजूर करतो.पित्तदोषाच्या विकृतीमुळे निर्माण होणारा थकवा खजुराने कमी होतो. खजूर हा शुक्रवर्धन करणारा आहे, असे आयुर्वेद शास्त्र सांगते.

आपल्या अंगी असलेल्या मधूर व शीत गुणधर्मामुळे खजूर हा रक्तपित्तवरही उपयोगी पडतो. वरील विवेचनावरून खजूरला आयुर्वेदशास्त्रने दिलेले महत्व ध्यानात येते.

भरपूर पोषणमुल्ये :- आधुनिक आहारशास्त्रने देखील खजूराला कमी लेखलेले नाही. खजुरामध्ये असलेल्या विविध घटकद्रव्याचे विश्लेषण आधुनिक आहार शास्राने केलेले आहे.

भरपूर पोषणमूल्ये असलेले हे फळ आहे,असे आधुनिक शास्त्र सांगते.ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या स्वरूपात यामध्ये साखर सापडते.

यामध्ये कार्बोहायड्रेटसचे प्रमाण ७५.% असते.प्रथिने व मेद हे त्यामानाने कमी प्रमाणात आढळतात.कॅल्शिअम,फॉस्फरस,लोह हे घटक या फळामध्ये सापडतात.त्याप्रमाणे हि जीवनसत्वे यामध्ये प्रामुख्याने असतात.

या फळामध्ये शरीराला मुबलक प्रमाणात उर्जा मिळते.लहान मुलाच्या दृस्तीनेही खजूर हे अत्यंत पौष्टिक असे खाद्य आहे.एका रशियन शास्त्रज्ञाने मांडलेल्या सिद्धांतानुसार खजूर हे पचनसंस्था प्राकृत ठेवण्यास मदत करतात.

खजूर घेण्याची पद्धत:-

रात्री खजूर पाण्यामध्ये भिजत ठेवून सकाळी त्यामधील बिया काढून टाकून त्याचे सेवन करणे यामुळे शरीरास बळ मिळते.

खजूर, मनुका आणि खडीसाखर एकत्र करून खाल्यास ते अत्यंत पुष्टीदायक तसेच उत्साहवर्धक ठरते.वृद्ध लोकांना येणाऱ्या अशक्तपणामध्ये खजूर उपयोगी पडतो.वृद्धांना चावण्यास गैरसोईचे असल्यास खजूर बी काढून मिक्सरमहदे टाकून मग दिल्यास व्यवस्थित खाता येतो.

बाजारातून आणलेल्या खजूर जसाचा तसा न वापरता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. न धुता घेतल्यास त्याबरोबर अनेक अनावश्यक गोष्टी आपल्या पोटात जाऊन त्रासदायक ठरू शकतात.अर्थात हि गोष्ट प्रत्येक फालच्या बाबतीत लक्ष्यात ठेवणे आवश्यक आहे.

वरील सर्व विवेचनावरून खजूराचे आपल्या शरीराच्या दृष्टीने असलेले महत्व लक्ष्यात येते.आपल्या आहारामध्ये विशेषतः हिवाळ्यामध्ये खजुराचा समावेश करणे आपल्या स्व्यास्थाच्या दृष्टीने उपकारकच ठरते हे नि:संशय.....