चहापान

|

अति प्रमाणात झाल्यास अनेक तक्रारींचे मुळ ठरणारे

चहापान

वैद्य विजय कुलकर्णी (नाशिक)

मो. ९८२२०७५०२१

सध्या चहापान हा विषय प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. या चहापानाचा आपल्या आरोग्याशी अतिशय जवळचा संबंध आहे. हा जवळचा संबंध लक्षात न घेताच हे चहापान चाललेले असते. कोणी पाहुणे आले कि कर चहा, खूप दिवसांनी रस्त्यात ओळखीचे कोणी भेटले कि, चालले चाह प्यायला. व्यापाऱ्याकडून मोठी खरेदी केल्यास त्याने पाजलेला चाह, असे वेगवेगळे चहापानाचे प्रसंग येतात.

एकाच व्यक्तीच्या संदर्भात हे प्रसंग एकाच दिवशी घडतात. असे सारखे घडत राहिले तर मग ही व्यक्ती कधी अल्सरचा रुग्ण बनते तर कधी आम्लपित्ताचा रुग्ण बनते. अति चहापान करणारी मंडळी, अनेकदा भूक कमी लागते म्हणून तकरार करत येतात. तर काही जन नेहमी तोंड येते अशी तक्रार घेऊन वैद्याकडे येतात. या व्यक्तीच्या दैनंदिन सवयींची नीट चौकशी केल्यास चहाचे अति प्रमाणात सेवन हे मोठे कारण वरील तक्रारींचे सापडते.

चहापान हे शरीराला अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टींपैकी नाही. चहापान ही शरीराला लागलेली अपरिहार्य सवय आहे. त्यामुळे ती बंद करावी, असा सल्ला देणे शहाणपणाचे ठरणार नाही. परंतु ते मर्यादित ठेवणे मात्र शरीराच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे हे समजून घेतले पाहिजे.

दिवसाला १५-२० कप चहा पिणारी काही मंडळी आहेत. ज्यांना धूम्रपानाची सवय आहे असे लोक धूम्रपान व चहापान हे दोन्ही एकत्र घेतात व अति प्रमाणात घेतात. हे खूप घातक ठरू शकते. वर उल्लेखिलेल्या काही तक्रारींबरोबच दात लवकर खराब होणे, केस लवकर पांढर होणे या देखील तक्रारी अति चहापानाने होऊ शकतात. तेव्हा अति चहापान करणारनो सावधान! तुम्हाला ही सवय लागली असेल तर आत्ताच ती कमी करा. खूप दिवसांपासूनची ही सवय असेल तर ती हळूहळू कमी करा. पण ती आहे तशीच ठेऊ नका. तिचे आरोग्यावर विचित्र परिणाम होतात हे जाणून घ्या. दुपारच्या वेळेस एखादा कप चहा घेण्यास हरकत नाही. हिवाळ्यामध्ये हा चहा आले टाकून घेतल्यास चांगले, त्याचप्रमाणे गवती चहाचा उपयोग सर्दी-पडसे झाले असल्यास चांगला होतो.

काही जण चहाऐवजी कॉफी घेतात. कॉफीच्या संधर्भातहि वर सांगितलेली मर्यादा ध्यानात घ्यावी. कॉफीचे अति सेवन करणाऱ्यांमध्ये मलावष्ट्भाची तक्रार (म्हणजे शौचास साफ ण होणे) बरेचदा आढळून येते.

तेव्हा दिवसातून १-२ वेळा चहा किवा कॉफी घेण्यास हरकत नाही. इतर वेळी घ्यायचेच झाले तर इतर पदार्थ आहेत. पावसाळ्यात, उन्हाळ्यात दुपारी लिंबाचे सरबत करून ते आपण घेऊ शकतो. ज्यांना शक्य असेल अशांनी मधूनमधून शहाळ्याचे पाणी पिण्यास हरकत नाही. ‘ताक हे पेय देखील मधल्या वेळेस प्राशन करण्यासारखे आहे ते उत्तम पाचक असते. भूक वाढवते.

वरील पदार्थाच्या तुलनेत चहा हा किमतीने स्वस्त असतो हे जरी खरे असले. तरी अति चहापानाने रोग निर्माण होऊन त्यावर होणारा उपचारांचा खर्च वरील पदार्थापेक्षा कितीतरी पटीने अधिक असू शकतो.

चहापानाचा संधर्भात एक महत्वाची गोष्ट म्हणजे रस्त्यावर किंवा उपहारगृहामध्ये अॅल्युमिनिंअमच्या भांड्यात उकळलेले पदार्थ सेवन केल्यास ते आपल्या चेतासंस्थेत धोकादायक ठरू शकते , हे विज्ञानाने सिद्ध केलेले आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी चहा पिण्याची सवय आपली झोप उडवू शकते. झोपेच्या तक्रारी निर्माण होतात.

चहाहे एक प्रकारचे व्यसनच आहे. अर्थात ते पूर्णपणे सोडणे शक्य नाही. पण त्याचे प्रमाण मर्यादित ठेवणे हे सहज शक्य आहे आणि प्रकृती चांगली ठेवण्याच्या दुष्टीने अति चहापान टाळणे हे अत्यावश्यक आहे.

उन्हाळ्यात चहा पेयल्यास त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो. चहा हा मुळात उष्ण गुणाचा आहे. उन्हाळ्यात बाहेर वातावरणात उष्णता आधीच वाढलेली असते. त्यातच अधिक प्रमाणत या काळात चहा प्यायला गेला तर त्याने शरीरातील उष्णता जास्त वाढते आणि पित्त्चे विविध रोग होऊ शकतात. चहा हा पित्त प्रकृतीचा व्यक्तीना देखील त्रासदायक ठरू शकतो हे मुदाम लक्षात घेतले पाहिजे त्या मानाने कफ आणि वात प्रकृतीचा व्यक्तीना मर्यादित प्रमाणत घेतलेल्या चहा चा त्रास होत नाही त्या मुळे चहापान आपल्या प्रकृतीवर अवलंबून असते.

लेखात पूर्वी उल्लेख केल्या प्रमाणे आम्लपित्त, अल्सर, त्वचेचे विकार, हातापायाची आग होणे, छातीत व पोटात जळजळ होणे, अशा तक्रारी ज्यांचा शरीरात आहे अशा व्यक्तींनी चहाचे सेवन पूर्णतः टाळणे त्यांचा आरोग्याचा दृष्टीने हिताचे ठरते. अशा प्रकारे चहापानासंबधी योग्य ती काळजी घेतल्यास आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.