चिकनगुनिया आणि आयुर्वेद
वैद्य. विजय कुलकर्णी, नाशिक.
आयुर्वेदीयदृष्टीने या सर्व साथीच्या रोगांना प्रतिबंध आणि प्रतिकार कसा करता येईल याबद्दल माहिती देणारा हा विशेष लेख...
‘एडीस’ जातीच्या डासाच्या माध्यमातून पसरणारा हा रोग एका विशिष्ट विषाणूपासून होतो. त्यामुळे ताप येणे, प्रचंड डोके दुखणे, सांधे दुखणे, मळमळ होणे, भूक न लागणे, अतिशय थकवा येणे इत्यादी, लक्षणे दिसतात. ताप येऊन गेल्यावरही अनेक दिवस सांधेदुखी कायम राहते, थकवाही प्रचंड असतो. आणि त्याला तोंड देतानाच रुग्ण आणखीनच थकून जातो असे दिसते.
गेल्या काही वर्षापासून जनसामान्यांना भेडसावणाऱ्या सार्स, बर्ड फ्लू, डेंग्यू अशा रोगांच्या पंक्तीतच हा ‘चिकन गुनिया’ येऊन बसला आहे. आणि पुन्हा एकदा त्याच्या प्रतिबंधासाठी आणि प्रतिकारासाठीही शासकीय यंत्रणेची धावपळ सुरु झाली आहे. या सगळ्या रोगांचे आक्रमण आपल्यावर होते. याचे कारण आपली प्रतिकारक्षमता कमी होत चालली आहे काय ? या प्रश्नाकडे मात्र गांभीर्याने कोणी बघायला तयार नाही, असेच वाटण्यासारखी परिस्थिती आहे. प्रत्येक वेळेला एखाद्या रोगाने डोके वर काढले की, मग त्या विशिष्ट रोगावर इलाज शोधायला लागायचे. मुंबईत विशेषतः पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिस या रोगाच्याही संदर्भात शासकीय यंत्रणेची अशीच धावपळ बर्याचदा उडाते. अशा या साथीच्या रोगांचे उच्चाटन करण्यासाठी अनेकदा शासकीय यंत्रणांमार्फत विविध Antibiotics सर्रास वाटली जातात. त्यांचा योग्य डोस दिला जातोय की नाही या बाबतीत कोणी नीट लक्ष घालतेय असेही दिसत नाही. याचाही आपल्या प्रतिकारशाक्तीवर होणारा विपरीत परिणाम दुर्लक्षून चालणार नाही.
नेमक्या याच कारणामुळे आपल्या देशात Drug resistant Tubercutosis (क्षय) या रोगाचे प्रमाण वाढताना दिसते आहे. कारण अनेक जण याची चिकित्सा शेवटपर्यत योग्य त्या डोसमध्ये घेत नाहीत. आजमितीला उपलब्द आकडेवारीनुसार आपल्या देशातील सुमारे ५ लाख लोक दरवर्षी या क्षयाने मृत्युमुखी पडतात. या क्षयाचे जंतू अनेक Antibiotics ना दाद देईनासे झालेत.
आपल्या देशात प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधे मिळण्याची असलेली (गैर) सोय हीदेखील या वाढत्या रोगांचे आणि कमी होत चाललेल्या प्रतिकारशक्तीचे कारण आहे. अनेक वेळा एखादा रोग पूर्ण बरा होईपर्यत वाट न पाहता थोडे बरे वाटू लागताच औषधे अर्थातच बंद केली जातात. अनेकदा एखादा रोग पूर्ण बरा झाला नाही तर तो पुढे दुसऱ्याच रोगाचाही पाया शरीरात तयार करून ठेवतो. आणि हे नंतर केव्हा तरी लक्षात येते. उदाहरणार्थ ‘आमांश’ आव होणे हा रोग पूर्णपणे बरा झाल्याविनाच खाण्यापिण्याचे नियमही मोडले गेले तर त्यातूनच पुढे ग्रहणी नावाचा चिवट रोग निर्माण होतो.
आरोग्य प्रबोधन गरजेचे
या सगळ्याच विषयांमध्ये आरोग्य प्रबोधन करण्याची नितांत आवश्यकता आहे. सार्स – बर्ड फ्लू – चिकन गुनिया - डेंग्यू – स्वाईन फ्लू अशा रोगांचा फैलाव होऊ नये म्हणून प्रयत्न करावे लागतील. पाणी, हवा पर्यायाने एकूणच पर्यावरण दुषित होणार नाही. निसर्गाचा समतोल बिघडणार नाही याकडे लक्ष पुरवावे लागेल आणि अशा विविध रोगांच प्रतिकार करण्यासाठी आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती उत्तम ठेवावी लागेल ती उत्तम ठेवायची असेल तर आपलं एकूणच बळ चांगलं राखावं लागेल ते तसं राखण्यासाठी गरज आहे ती नियमित दिनचर्या ऋतुचर्या यांची आपला एकूण दिनक्रम दिवसातला आहार – विहार नियमित आणि आरोग्यपूर्ण असण्याची आवश्यकता आहे. नेमके हेच होत नसल्याने आता अनेक आरोग्य समस्या उदभवत आहेत.
त्या त्या आरोग्य समस्येचा प्रत्येक वेळी प्रासंगिक तात्पुरता वेगवेगळा विचार करण्यात येतो. पण याचा सर्वागीण बोध घेऊन एकूणच चांगल्या दिशेने आरोग्य शिक्षण आरोग्य प्रबोधन हे होताना दिसत नाही एकीकडे एड्स विरोधी वातावरण तयार करण्याचे अनेक प्रयत्न होतातच पण दुसरीकडे योग्य दिशेने लैंगिक शिक्षणही मिळत नाही. आहारविहारा संबंधीही शालेय स्तरावर तुटपुंजी माहिती दिली जाते. तिचा विस्तार आपल्या देशाच्या आरोग्याच्या स्थितीला अनुसरून करणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय आरोग्य मोहीम सक्षमतेने राबवावी
केंद्र सरकारने गेल्या १०-११ वर्षापासून महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेचा प्रारंभ केला त्याद्वारे गावातील आरोग्यरक्षक यांच्या माध्यमातून आरोग्य प्रबोधनाचे उपक्रम आखले जात आहेत. त्यासाठी त्यांना प्रशिक्षितही केले जाते. चिकन गुनिया, कुपोषण हे त्रासदायक प्रकार होऊ नयेत यासाठी ग्रामीण भागातही त्यासंबंधीची माहिती नीट पोहोचणे गरजेचे आहे.
चिकन गुनिया आणि आयुर्वेद
सध्या थैमान घालत असलेला चिकन गुनिया आयुर्वेदीय व्यावसायिकांसमोरही एक आव्हान आहे. सामान्यत: वातप्रधान ज्वर असे याचे आयुर्वेदीयदृष्टया निदान असून त्यावर प्रामुख्याने गुळवेल, काडेचिराईत अशा कडू द्रव्यांचा उपयोग करता येतो. महासुदर्शन चूर्ण किंवा महासुदर्शन वटी किंवा महासुदर्शन काढा यांचाही उपयोग विशेषत: अंगदुखीवर अर्थातच योग्य व वैद्यकीय सल्ल्याने घेतल्यास उपयोग होतो, असा अनुभव आहे, नागरमोथा या वनस्पतीचाही चांगला परिणाम यामध्ये दिसतो. ही सर्व औषधे विविध प्रकारच्या तापांवर आम्ही वैद्य मंडळी वापरतो. तेव्हा शासकीय व्यवस्थेनेही याची दखल घ्यायला हरकत नाही. नगर जिल्ह्यातील खारे करजुळे गावात काही वर्षांपूर्वी नगर जिल्हा आयुर्वेद व्यासपीठाच्या वतीने एक सेवा केंद्र सुरु केले होते, चिकन गुनियासाठी तेथेही आयुर्वेदीय चिकित्सा देण्यात आली होती. तापावर आयुर्वेदात औषधच नाही, असा एक सामान्य गैरसमज आहे तो चुकीचा असून, योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाखाली अशा रोगांवर चिकित्सा होणे आवश्यक आहे.