शरद ऋतूतील आहार -लेखक – वैद्य विजय कुलकर्णी
पावसाळा संपूण शरद ऋतूची सुरुवात झाली की मग दीड दोन महिने थोडी उष्णता जाणवू लागते.याला ऑक्टोबर हिट असे व्यवहारात म्हणतात.आयुर्वेदाने या कालावधीला शरद ऋतू असे म्हटले आहे.या बदलत्या हवामानाचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ नये म्हणून शरद ऋतूमध्ये काय आहारविहार असावा याचेही मार्गदर्शन भारतीय शास्त्रात केले आहे.ते आजच्या धावपळीच्या काळातही उपयोगी ठरते.
या काळात शरीरात पित्त दोषाचे प्रमाण नैसर्गिकरीत्या वाढत असते. त्यामुळे अनेक वेळा शरीरात उष्णतेचे त्रास जाणवू लागतात.म्हणून या काळात चवीला गोड ,तुरट आणि कडू असे पदार्थ असावेत असे आयुर्वेदशास्त्र सांगते.
या ऋतुमध्ये पाणी हे अतिशय निर्मल दोषरहित असे असते.याला या काळात त्याला हंसोदक असे म्हणतात. अगस्ती तारा या दिवसात उगवत असल्याने हे पाणी विष रहित बनते अशी कल्पना यामागे आहे.असे हे पाणी या काळात कफ आणि पित्त यांचे शमन करते असे शास्त्र सांगते.पाणी पिताना त्यामध्ये चंदन किंवा कापूर मिश्र करून ते पाणी प्यावे.गुलाबजल हेदेखील फार उपयुक्त असे ठरते,कारण ते शरीरातील उष्णता कमी करणारे आहे.म्हणून या दिवसात गुलाबापासून बनवलेला गुलकंद खाण्यात वापरतात. आवळा हे फळ या दिवसात खूप आरोग्यदायी ठरते.या ऋतुमध्ये आवळा यायला सुरुवात होते.हे फळ अत्यंत शीतल असून ते अंगातली उष्णता वाढू देत नाही आणि वाढलेली उष्णता कमी करते.या फळाचा रस किंवा चुर्ण आपल्या आहारात अवश्य असावे.आवळ्या पासून बनवलेला मोरावळा देखील या दिवसात चांगला उपयोगी ठरतो.या दिवसात शरीरातील पित्ताचे प्रमाण कमी करण्यासाठी विरेचन हे एक कर्म सांगितले आहे आवळा हे फळ सारक गुणाचे असल्याने त्यानेही थोडे विरेचन होऊन पित्त कमी होण्यास मदत होते.या ऑक्योबर हिट मध्ये दूध आणि तुपाचे पदार्थ अतिशय आरोग्यदायी ठरतात.म्हणून आपण या ऋतूत कोजागरी पौर्णिमा साजरी करतो.या दिवसात चंद्राच्या शीतल चांदण्यात बसून दुग्धपान करण्याचा सल्ला खुद्द शास्त्रकार देतात.दूध आणि तूप हे दोन्ही पदार्थ गुणाने थंड आणि पित्ताचे शमन करणारे असे आहेत.दुर्वांचा रस काढून त्याचेही सेवन या काळात उपयुक्त ठरते .या दिवसात भाज्या खातानाही त्या उष्ण नसतील अशा घ्याव्यात,पडवळ ,भेंडी, दुधी भोपळा अशा भाज्या खाव्यात,मेथी,गवार,शेवगा अशा भाज्या टाळलेल्या केव्हाही चांगल्या.शरद ऋतुमध्ये चहाचे सेवन जपूनच करावे.कारण चहामुळे शरीरातली उष्णता वाढते.तिखट, खारट आणि आंबट पदार्थही या काळात अतिशय कमी प्रमाणात खावेत.कारण त्यामुळेही शरीरात उष्णता वाढते.या काळात दही खाऊ नये असा स्पष्ट सल्ला शास्त्रकारांनी दिला आहे.कारण दही हे थंड नसून उष्ण आहे.लोण्याचा उपयोग मात्र या दिवसात हिताचा ठरतो.लोणी आणि साखर हे मिश्रण खावे.ताक मात्र जरा जपून प्यावे.उन्हातून आल्यावर लगेच गार पाणी पिऊ नये.शरीरात थंडावा राहावा यासाठी कृत्रिम शित्पेयांचा वापर टाळावा .त्या ऐवजी आवळा गुलाब कोकम यांचे सरबत अधिक चांगले ठरते.या दिवसात सुक्या मेव्यापैकी बदाम, काजू हे उष्ण असल्याने टाळावे.त्याऐवजी काळ्या मनुका घ्याव्या.त्यांचा दुहेरी उपयोग होतो.कारण मनुका गुणाने थंड असून पित्ताचे शमन करतात.मांसाहार या काळात वर्ज्य समजावा.कारण तो बहुतकरून उष्ण गुणाचा असतो.या काळात फळे खाताना अशीच काळजी घ्यावी.पपई सारखी उष्ण फळे टाळून आवळयासारखी थंड आणि पित्तशामक फळे खावीत.मसालेदार पदार्थही उष्ण असल्याने शरद ऋतूमध्ये
टाळायला हवेत.चंदनचारोळी ,सारीवा,ज्येष्ठमध अशा वनस्पतींनी युक्त दुधाचे सेवन केवळ कोजागारीच्या दिवशी न करता या संपूर्ण काळात करावे,तूप खातानाही ते दुर्वा सिद्ध करून मग प्यावें कारण त्याने पित्त कमी व्हायला मदत होते,अशा रीतीने शरद ऋतुमध्ये आपला आहार हा शीतल ,पित्तशामक असा असावा.तसा तो असला म्हणजे या काळात होणारे आजार टळू शकतील आणि आपले स्वास्थ्य उत्तम राहाण्यास मदत होईल .