आयुर्वेदिक संगीत उपचार

01 Oct 2020 13:06:53
 
 जागतिक संगीत दिन १ ऑक्टोबर
 
 
 
मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त
आयुर्वेदीय संगीतोपचार
वैद्य विजय कुलकर्णी ,नाशिक
संपादक आरोग्य चिंतन
मो.९८२२०७५०२१
आयुर्वेद आणि शास्त्रीय संगीत ही दोन्ही आपल्या देशाने जगाला दिलेली देणगी आहे. आजच्या ऐकूण धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक अनेक जण आपले मानसिक स्वाथ्य हरवून बसले आहे. विशेषतः तरुण पिढी तर डिप्रेशनच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात फसलेली दिसते आहे.त्यातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचाराचे सहाय्य घेऊन ‘अँटी दिप्रेससन्ट’ गोळ्या खाण्याचेही प्रमाण समाजात वाढले आहे. डिप्रेशनप्रमाणेच कौटुंबिक ताणतणाव, व्यवसायजन्य परिस्थितीचा ताण, निद्रानाश, सततची चिंता, या मनाच्या अवस्थाही वाढल्या आहेत.त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी विविध अध्यात्मिक मार्गांचाही शोध घेण्याचा प्रयत्न काही जण करताना दिसतात. या पाश्वभूमीवर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा सदुपयोग मानसिक स्वास्थ्यासाठी होतो. हे लक्षात घेऊन त्याला आयुर्वेद शास्त्राची जोड देऊन, या दोन्ही शास्त्रांच्या समन्वयाने काही पूरक उपचार करता येतील, अशी संकल्पना मनात आली. मी स्वतः या दोन्ही शास्त्राचा अभ्यासक असल्याने एकूणच समाजस्वास्थ टिकवण्यासाठी या दोन्ही भारतीय शास्त्रांचा संयोग घडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आणि वर्षे - दोन वर्षांच्या चिंतनानंतर पूरक आयुर्वेदीय संगीतोपचार ही अभिनव संकल्पना उद्याला आली.
रागांचे नवरस
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा उपचार म्हणून उपयोग करण्याचा प्रयत्न ‘म्युझिक थेरपी’ म्हणून आजपर्यंत बऱ्याचदा झाला आहे. पण त्याला आयुर्वेदाची जोड देण्याचा हा कदाचित पहिला प्रयत्न असावा.
प्राचीन संगीत ग्रंथामध्ये सुमारे ५०० राग वर्णन केले असले, तरी सामन्यतः ८०-८५ राग सध्या हिंदुस्थानात प्रचलित आहेत, या प्रत्येक रागाचा स्वःतचा असा मूड आहे. काही राग करुण आहेत, तर काही शांत. अनेक राग शृंगार रसप्रधान आढळतात. संगीतशास्त्रानेच या रागांचे वर्गीकरण करुण, शांत, शृंगार, हास्य, वीर, रौद्र, बीभत्स, गंभीर आणि भयानक अशा नऊ रसांमध्ये म्हणजे भावांमध्ये केले आहे. या शास्त्रीय वर्गीकरणाचा उपयोग करत विविध रागांचा उपयोग मनाच्या विविध अवस्थांमध्ये करून घेता येईल.
मनाच्या विविध अवस्था
मन चंचल आहे. त्याच्या अनेक अवस्था बघायला मिळतात. अस्थिर मन, अस्वस्थता, चिंता, शोक, क्रोध, मोह, मद, मत्सर, अतिउत्साह, निरुत्साह, दुखः, आनंद, आत्मविश्वास नसणे, अतिआत्मविश्वास ,प्रलाप ,भ्रम, दीनता आळस,डिप्रेशन, वैराग्य अशा अनेक अवस्था आपल्याला अनुभवायला मिळतात. या सर्वांतून मनाचे स्थैर्य गाठणे हे प्रत्येकाचे धेय्य असते. त्यासाठी संगीतातील रागांचे नवरस उपयोगी पडू शकतील.
आयुर्वेद शास्त्राने सामान्य विशेष सिद्धांत सांगितला असून, समान गुणाने समान गुणाची वाढ आणि विपरीत गुणांचा ऱ्हास होतो, असे हा सिद्धांत सांगतो. येथे मनाच्या दुखः या अवस्थेत शृंगार रसप्रधान आनंदी स्वभावाचा श्यामकल्याण किंवा मल्हार केदार असे राग किंवा त्यावरील आधारित गाण्याचे श्रवण करणे हा पूरक आयुर्वेदीय संगीतोपचार झाला.
जसे रागांचे नवरस आहेत तसेच वाद्यांचेही स्वतःचे मूड्स आहेत. उदाहरणार्थ – सारंगी, व्हायोलिन ही वाद्ये साधाहरणतः कारुण्य दर्शवतात. सतार हे वाद्य आनंदाचे प्रतिक आहे, तर शहनाई म्हणजे मंगलवाद्य म्हणून प्रसिद्ध आहे. अशा रीतीने तालवाद्यांचेही आहे. या सर्व वाद्यांच्या स्वभावाचाही उपयोग या पूरक उपचारपद्धतीत होत असतो. आनंदाने उन्मत झालेल्यांना करुण वाद्यावर तोडी राग ऐकवणे हा उपाय होय. अत्यंत दुखी व्यक्तीला सतारीवर श्यामकल्याण, केदार असे राग ऐकवणे, डिप्रेशनमध्ये असलेल्या किंवा आत्मविश्वास गमावलेल्या व्यक्तीला वीर रसप्रधान राग ऐकवणे उपयुक्त ठरते. निद्रानाश या अवस्थेवर शांत स्वभावाचे राग बासरीसारख्या गंभीर वाद्यावर ऐकवल्याने उपयोग होणार आहे.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात रागांच्या विशिष्ट वेळा सांगितल्या आहेत. त्या विशिष्ट वेळी तो राग गायल्यास त्याचा मनावर व शरीरावर अनुकूल परिणाम होतो. आयुर्वेदातही शरीरातील वात, पित्त, आणि कफ या तीन दोषांच्या दिवस आणि रात्रींच्या वेळांचे वर्णन केले आहे. मनाच्या निर्माण होणाऱ्या विविध अवस्थाही या तीन दोषांमुळे nirmanनिर्माण होतात. उदाहरणार्थ वातामुळे मन, चंचल, तर पित्तामुळे क्रोध निर्माण होतो. कफामुळे आळस वाढतो. अशा रीतीने मनाच्या अवस्थांचेही या तीन दोषांप्रमाणे वर्गीकरण करता येते. आता दिवसा आणि रात्री या तीन दोषांची वेळ आणि त्या विशिष्ट वेळेचा राग यांचाही सबंध एकमेकांशी असला पाहिजे कारण शास्त्रीय संगीत आणि आयुर्वेद ही दोन्ही मूळ भारतीय शास्त्रे आहेत. संगीत रत्नाकर हा प्रख्यात ग्रंथ शारंगधर याने लिहिला. शारंगधर या नावाच्याच एका वैद्याने शारंगधरसंहिता हा आयुर्वेदीय ग्रंथ लिहिला आहे. या दोन शारंगधरामध्ये काही ना काही नाते असावे असे वाटते.
अशा रीतीने या दोन्ही शास्त्रांचा योग्य मेळ घालून पूरक आयुर्वेदीय संगीतोपचार ही अभिनव संकल्पना उदयाला आली आहे. हा उपचार अन्य उपचारांना पूरक आहे. आयुर्वेदीय शास्त्रांची त्याला जोड आहे आणि संगीताचा त्यामध्ये उपयोग केल्याने तो पूरक आयुर्वेदीय संगीतोपचार आहे या पूरक उपचारांचा उपयोग आपल्या मनाच्या प्रसन्नतेसाठी , स्वास्थ्यासाठी व्हावा अशी संकल्पना आहे. अगदी मानसोपचार तज्ञांनाही या उपचारांचा उपयोग करुण घेता येईल जसजशी ही संकल्पना विकसित होईल व्यवहारात येईल तसतशी त्या तज्ञांकडून भरही टाकली जाईल.
Powered By Sangraha 9.0