असा हा विलक्षण योगा ( नव्हे ) योग .....
लेखक :- वैद्य विजय कुलकर्णी , नाशिक
मो – ९८२२०७५०२१
२१ जून रविवार हा जागतिक योगदिन म्हणून सर्वत्र online साजरा होत आहे. या निमित्ताने विशेष लेख. मन आणि शरीरासाठी योग शास्त्र हे अत्यंत उपयोगी आहे . हे शास्त्र आयुर्वेदाप्रमाणेच भारतीय मूळ असलेले प्राचीन शास्त्र आहे. परंतु आजच्या सामाजिक आरोग्याच्या चिंता जनक परिस्थितीत योगाचे महत्व संपूर्ण जगाला पटलेले आहे . त्यामुळेच योगाचे पेटंट घेण्याचा प्रयत्न काही देशात झाला होता. मानवाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी त्याचे मन शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. योगाने हे दोन्ही साध्य होऊ शकते. योग शास्राचे आठ आयाम आहेत १] यम २] नियम ३] आसन ४] प्राणायाम ५ ] ध्यान ६] धारणा ७] प्रत्याहार ८] समाधी. याला अष्टांगयोग असे म्हणतात.योग म्हणजे चित्त आणि वृत्ती या वर नियत्रण ठेवणे होय.आज नेमके हेच नियंत्रण न राहिल्यामुळे अनेक समस्या निर्माण होताना दिसत आहेत. माणूस माणसाला ओळखेनासा झाला आहे.त्याचे मन स्थिर नाही ते चंचल बनले आहे. लोभ,क्रोध,आशा शत्रूंनी या मानावर आक्रमण केले आहे. अनेकदा मन त्या मुळे चिडचिडे होते काही
वेळा कशाचेही भान राहत नाही . योगशास्त्र हे प्राचीन भारतीय शास्त्र असून पंतजली मुनी हे ह्या शास्त्राचे प्रवर्तक मानले जातात. त्यांनी लिहलेला पंतीजली योग दर्शन हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ह्या मध्ये योग शास्त्राचे समग्र वर्णन आहे. हरिद्वार येथे स्वामी रामदेव यांनी पंतजली योगपीठ या नावाची मोठी संस्था सुरु केली आहे. भारतात योगाचा प्रचार करण्यासाठी तसेच त्याचे शिक्षण देण्यासाठी अनेक यंत्रणा कार्यरत आहेत. बंगलोर जवळ प्रशांत कुटीरम येथे स्वामी विवेकानंद यांच्या नावाने शंभर एकर जागेत योगाचे शिक्षण देणारे भव्य विद्यापीठ आणि संशोधन केंद्र आहे. डॉक्टर नागेंद्र हे त्याचे कुलगुरू आहेत. येथे योगाचे पदवी आणि त्या पुढील शिक्षण दिले जाते. नाशिक मधील योगाचार्य श्री विश्वास मंडलिक यांनी स्थापन केलेल्या योग विद्याधाम या संस्थेत अनेक योग शिक्षक तयार होतात आणि समाजात जाऊन योगाचा प्रचार करतात. विदेशात हि योगाचा प्रचार या द्वारे केला जातो. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने योगाच्या प्रसारासाठी योग दिनाच्या निमित्ताने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.
मन आणि शरीर हे निरोगी राखण्यासाठी योगाचा उपयोग होतो. योगासनाचा उपयोग मान, पाठ, कंबर .मणके, डोके, पोट यांच्या अनेक तक्रारींवर होतो. योग म्हणजे केवळ आसने आसा काहींचा समज आहे. परंतु या शास्राची व्याप्ती मात्र खूप मोठी आहे. योगामुळे मन संतुलित रहाते स्थिर होते आपण संयमी बनतो. अनेक गोष्टी करण्याची क्षमता निर्माण होते. आपले मन आणि आत्मा प्रसन्न रहातात योग हा प्रत्येकाने करावयाचा आहे. त्याचा प्रत्येक व्यक्तीने अनुभव घेणे आवश्यक आहे. लहान थोर तसेच स्त्री पुरुष हे सर्व याची अनुभूती घेऊ शकतात. योग केवळ टीवी वर बघून साधणार नाही त्याचे योग्यरीतीने प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. खरे तर योग आणि आयुर्वेद हि दोन्ही शास्त्रे शालेय स्तरापासून शिकवायला हवीत. याची योजना सरकारने केली पाहिजे समाजाच्या आरोग्य प्रबोधनासाठी हि दोन्ही शास्त्रे सर्वांपर्यंत पोहचली पाहिजेत.
देश निरोगी करायचा असेल तर प्रथम व्यक्ती निरोगी व्हावी , मग परिवार निरोगी व्हावा त्यानंतर प्रत्येक गाव किवा शहर निरोगी व्हावे या सर्वांसाठी योगशास्त्र समजून घेणे आणि त्याचा अवलंब करणे याचा निश्चय या योगदिनाच्या निमित्ताने आपण सारे करूया .