तुळस (कफ आणि वातावर उपयोगी)

    Date : 30-Jun-2020
|

तुळस

                     (कफ आणि वातावर उपयोगी)

                                                            वैद्य विजय कुलकर्णी

                                                              आयुर्वेद चिकित्सक,नाशिक                                                                           मो-९८२२०७५०२१

तुळसीचे असणारे छोटेसे झाड आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे.प्रत्येक दाराशी तुळस असावी. अशी असणारी आपली भावना सार्थ ठरविणारे अनेक आरोग्यदायी गुण या छोटाश्या तुळसीत आहे.सुरसा, हरिप्रिया,वृंदा अशी पर्यायी नावे असणाऱ्या या तुळसीचे झाड २ ते ३ फूट वाढते तिची पाने हातावर चोळल्यास त्यांना एक प्रकारचा सुगंध येतो.

गुणधर्म- तुळसीची पाने ही गुणाने उष्ण,रुक्ष आणि पचायला हलकी असतात. ती चवीला तिखट असते.पण तुळसीचे बी मात्र गुणाने थंड असते.एकाच तुळसीचे पाने उष्ण आणि बी थंड ही निसर्गाचीच किमया म्हणावी लागेल.तुळसीची पानेही कफ आणिवात या दोन दोषांचे शमन करतात.तर पित्ताला वाढवतात याउलट तुळसीचे बी मात्र पित्ताचे शमन करते आणि शरीरातील उष्णता कमी करते.

औषधी गुणधर्म -  तुळसीची पाने ही कफाच्या सर्व विकारांवर अत्यंत उपुक्त आहे.जुनाट सर्दी पडसे, कफाचा खोकला,दमा,कफामुळे होणारी डोकेदुखी यावर तुलसीच्या पानांचा रस काढून तोयोग्य सल्ल्याने मधाबरोबर घेतल्यास वरील त्रास कमी होतात.त्याचप्रमाणे तुळसीची पाने लवंग, आले,इ. काही औषधे काढा करुन योग्य वैद्याच्या सल्ल्याने काफांच्या विकारावर उपयोगी पडतात.तुळसीची पाने चावून खाल्ल्यास तोंडात येणारा कफाचा चिकटपणा कमी होतो.तुळसीची पाने खाल्ल्यास आपली भूक आणि पचनशक्ती वाढते.

तुळसीच्या दोन प्रकारांपैकी कृष्णतुळस ही अधिक आरोग्यदायी आहे.अपचन,अजीर्ण या पचनाच्या विकारांवर तुळसीची पाने उपयोगी पडतात.तुळसीची पाने ही कृमिनाशक असल्याने पोटातील जंतावर यांचा उपयोग होतो.या पानांमुळे पोटातील वायू खाली सरण्यास मदत होते.शरीराच्या स्थानिक भागात येणारी सूज आणि वेदना यावर तुळसीपत्राचा बाहेरून लेप देतात.हवा शुद्ध करण्यासाठी तुळसीचा चांगला उपयोग होतो.त्यामुळे आपल्या घरासमोर तुळस लावणे हे आरोग्यदायी ठरते. अर्थात तुळसीची पाने ही अतिप्रमाणात खाऊ नये.

     तुळसीच्या बिया या थंड असल्याने पित्ताच्या अनेक विकारात त्यांचा उपयोग होतो.नाकातून रक्त येणे,तोंड येणे,पोटातील उष्णता,लघवीला आग होणे,महिलांच्या मासिक पाळीच्यावेळी अधिक रक्त स्त्राव होणे अशा पित्ताच्या अनेक तक्रारींवर तुळसीच्या बियांचा उपयोग इतर पित्तशामक औषधांबरोबर योग्य सल्ल्यानुसार करता येतो.या बियाची खीर पोटातील आवेवरही उपयोगी पडते. तुळसीचा आणखी एक उपयोग म्हणजे मुतखडा तसेच बस्तीशोथ यातही ती उपयुक्त आहे. अशा प्रकारे तुळस हे निसर्गातील एक उत्तम औषध आहे.