गुलाब
वैद्य विजय कुलकर्णी
आयुर्वेद चिकीत्सक नाशिक
मो ९८२२०७५०२१
गुलाबाचे फुल हे स्नेहाचे आणि प्रेमाचे प्रतिक मानले जाते.त्याचा असणारा सुगंध आपले मनही प्रसन्न करतो.आपल्या मध्ये स्नेह निर्माण करणारा असा हा गुलाब खरोखर गुणाने अत्यंत स्निग्ध आणि शीतल म्हणजे थंडावा देणारा असा आहे.फार प्राचीन काळापासून आपल्या पूर्वजांना गुलाबाचे झाड ,त्याचे सुगंधी आणि आकर्षक फुल आणि त्याचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत. भाव प्रकाश या आयुर्वेदीय शास्त्रज्ञाने शेकडो वर्षांपूर्वी गुलाबाचे फुल हे उत्तम पित्तशामक असल्याचे सांगितले आहे.
गुलाबाचे फुल हे अत्यंत सुगंधी असते. त्यामुळे वातावरणात एक प्रकारची प्रसन्नता निर्माण होते. अनेक वेळा पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना बराच घाम येतो. काही वेळा काही जणांमध्ये या घामाला दुर्गंधी येते. अशा वेळी घामाची हि दुर्गंधी कमी करण्यासाठी अनेक जण केमिकल युक्त सेंट चा वापर करतात. परंतु अशा सेंट चा अतिवापर आरोग्याला हिताचा ठरत नाही. म्हणून अति घाम येणाऱ्या आणि घामाला दुर्गंधी असणार्या व्यक्तींनी अंगाला बाहेरून लावण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचे चूर्ण तसेच गुलाबाचे नैसर्गिक अत्तर वापरावे. पित्त प्रकृती नसलेल्या काही जणांना (उदा.मधुमेही व्यक्ती) उन्हाळ्यात वरील प्रमाणे त्रास होतो. त्यांनाही गुलाबाचा उत्तम उपयोग होतो.गुलाब हा थंड गुणाचा असल्याने तो शरीरातील उष्णता कमी करतो.आम्ल पित्तात तसेच लघवीची होणारी, जळजळ मुळव्याधीचा दाह, लहान मुलाच्या नाकातून येणारे रक्त, अशा विविध तक्रारींमध्ये योग्य वैद्यकीय सल्ल्याने गुलकंदाचा उत्तम उपयोग होतो. स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी अतिप्रमाणात रक्तस्त्राव होत असेल आणि शरीरातील वाढलेली उष्णता हे त्याचे प्रमुख कारण असेल तर काही आयुर्वेदीय औषधांबरोबर गुलकंद दिल्यास फायदा होतो. अर्थात यासाठी योग्य वैद्य किय सल्ला अवश्य घ्यावा.
उन्हाळ्यामध्ये अनेकवेळा तीव्र उन्हामुळे डोळ्यांची आग होते. तसेच जागरणामुळे किंवा संगणकावर बराच वेळ काम करावे लागल्यामुळे होणारा नेत्रदाह गुलाब पाण्याच्या पट्ट्या डोळ्यावर ठेवल्याने कमी होतो. गुलाबाचे सरबत करूनही ते शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी वापरतात. गुलाब हा रुद्याला हितकारी असून त्वचेलाही आरोग्यदायी आहे. त्याला संस्कृत मध्ये तरुणी असे सार्थ नाव दिले आहे. अशा या गुलाबाचा आपल्या आरोग्यासाठी विविध प्रकारे उपयोग होतो.